हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
तासगाव | प्रतिनिधीकडेगाव (जि. सांगली) येथील पत्रकार परवेज तांबोळी यांच्यावर बातम्या प्रसिद्ध केल्याच्या रागातून काही रिक्षाचालकांनी भ्याड हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्याचा तासगाव तालुका पत्रकार संघ आणि तासगाव तालुका डिजिटल मीडिया यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.यासंदर्भात तहसीलदार अतुल पाटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले.पत्रकार परवेज तांबोळी हे सध्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. पत्रकारांच्या लेखणीला दहशतीच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. हल्लेखोरांवर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करून सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.सध्या विटा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने पत्रकार संघटना स्वतंत्र आंदोलन उभारण्यास इच्छुक नाहीत. मात्र, याचा अर्थ पत्रकारांवरील हल्ले सहन केले जातील असा नाही. पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई न केल्यास कडेगावसह परिसरातील पत्रकारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.यावेळी तासगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू जमदाडे, उपाध्यक्ष संजय पाटील, संस्थापक संजय माळी, सचिव प्रदीप पोतदार, विनायक कदम, उत्तम जानकर, तासगाव तालुका डिजिटल मीडिया अध्यक्ष संकेत पाटील, मिलिंद पोळ, किरण देवकुळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमोल तुंगे, आबासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्या, हल्लेखोरांना तातडीने अटक करा आणि पत्रकारांच्या लेखणीवरील हल्ले खपवून घेणार नाही, अशी ठाम भूमिका पत्रकार संघटनांनी व्यक्त केली.

