धार्मिक उन्माद सोडा; समन्वयात्मक ज्ञानाचा दीप अंतःकरणात प्रज्वलित करा!सद्विचारांचे अनुशासन हीच काळाची गरज – परमात्मराज महाराज

आडी (निपाणी) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रवचनास हजारो भाविकांची उपस्थिती

आडी (ता. निपाणी), बुधवार दिनांक – 25 नोव्हेंबर 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाजात शांतता व सौहार्द निर्माण करण्यासाठी संकुचित वृत्तीचा त्याग करून प्रत्येकाने समन्वयात्मक विचारांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. केवळ धडपड करून चालत नाही, तर त्या धडपडीला शिस्तीची जोड असणे गरजेचे आहे. धार्मिक व सांप्रदायिक उन्माद दूर सारून प्रत्येकाने आपल्या आचरणात सद्विचारांचे अनुशासन बाळगावे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले.आडी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणचिन्हांचे अभिषेक पूजन व महाआरती करण्यात आली. रात्री नामजपानंतर प्रवचन कार्यक्रम पार पडला.जीवनात शिस्तीचे महत्त्व स्पष्ट करताना महाराज म्हणाले, शेतातील पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांध घातले जातात. त्याचप्रमाणे जीवनातील अमूल्य संधी वाया जाऊ नयेत म्हणून माणसाने स्वतःच्या आचरणाला शिस्तीचे बांध घालणे आवश्यक आहे. जीवन जितके आव्हानात्मक असेल, तितकी शिस्त अधिक महत्त्वाची ठरते.धार्मिक, सांप्रदायिक, सत्तेची किंवा संपत्तीची नशा माणसाला विवेकशून्य बनवते. अशा उन्मादातून बेताल वक्तव्ये होतात आणि समाजात संघर्ष निर्माण होतो. माणसाला काय बोलावे आणि काय बोलू नये, याचे भान असणे हीदेखील शिस्तच आहे. कोणत्याही धर्माच्या किंवा संप्रदायाच्या नावाखाली द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन मिळता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.वाऱ्याच्या ऊर्जेचे उदाहरण देताना महाराज म्हणाले, बेफाम वाहणारा वारा विध्वंसक ठरू शकतो; मात्र त्याच वाऱ्याला शिस्तबद्ध पद्धतीने वापरल्यास त्यातून विद्युतनिर्मिती होते. त्याचप्रमाणे मानवी सामर्थ्याला शिस्तीची जोड मिळाल्यास त्याचे रूपांतर आध्यात्मिक ऊर्जेत होऊ शकते. विज्ञान आणि आधुनिक ज्ञानाचा स्वीकार करताना जुन्या संतांच्या विचारांचाही आदर राखला पाहिजे. केवळ संप्रदायाच्या चौकटीत अडकून न राहता समन्वयात्मक विचार स्वीकारणे ही काळाची गरज आहे.सत्य, अहिंसा, अस्तेय यांसारखे धर्माचे मूलभूत नियम सर्व मानवांसाठी समान आहेत. धर्म माणसाच्या स्वातंत्र्यावर बंधने घालत नसून त्याच्या हितासाठी योग्य मर्यादा निश्चित करतो. त्यामुळे शिस्तबद्ध आचरणातूनच व्यक्ती आणि समाजाची उन्नती शक्य आहे. केवळ बुद्धिमत्ता असून उपयोग नाही, तर ध्येयपूर्तीसाठी सातत्यपूर्ण मेहनत आणि अनुशासन आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.धार्मिक व सांप्रदायिक उन्मादातून बाहेर पडून बुद्धीला समन्वयात्मक विचारांची शिस्त लावण्यासाठी प्रत्येकाने मनात ‘सन्निश्चय’ केला पाहिजे. याच उद्देशाने १६ तारखेपासून आठ दिवसांचा ‘परमाब्धि विचार महोत्सव’ आयोजित करण्यात येणार असून, पहिल्याच दिवशी ‘सन्निश्चय’ या नावाचे नऊ ग्रंथ/खंड प्रकाशित करण्यात येणार आहेत. वर्षातील एक आठवडा या विचार महोत्सवासाठी देऊन भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परमात्मराज महाराज यांनी केले.यावेळी प्रसाद रघुनाथ वाशीकर (हुपरी) यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, डॉक्टर, देणगीदार आणि भाविकांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष पंकज पाटील, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. दुरदुंडी आलूरे, डॉ. विवेक नाईक, प्रमोद पाटील, फारुख देसाई, नाशिर नाईक, वसंत धारव, डॉ. ज्योती निकम, अशोक चौगुले, श्रीकांत चौगुले, प्रियांका वाणी, अनिल वाणी, संस्कार सावंत, प्रथमेश पाटील, प्रणव नलवडे, धैर्यशील पाटील, राणी मनिकेरी, ॲड. सी. बी. कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.आडी, बेनाडी, कोगनोळी, सौंदलगा, निपाणी, कागल, हुपरी परिसरासह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतून हजारो भाविकांनी उपस्थित राहून प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

आठ दिवसांचा ‘परमाब्धि विचार महोत्सव’प्रारंभ : १६ तारखेपासूनकालावधी : सलग आठ दिवसविशेष आकर्षण : ‘सन्निश्चय’ नावाचे नऊ ग्रंथ/खंड प्रकाशित होणार.उद्देश : सर्व संतांच्या विचारांचा सन्मान, धर्मग्रंथांचा सार समजून घेणे आणि समाजात समन्वयात्मक विचारांचा प्रसार करणे.आवाहन : वर्षातील एक आठवडा या महोत्सवासाठी देऊन भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

धर्माच्या नावावरील उन्माद नव्हे, सद्विचारांचे अनुशासन हवे!शिस्तीशिवाय जीवनाची उन्नती अशक्य, समाजातील संघर्षाचा अंधार दूर करण्यासाठी समन्वयात्मक ज्ञानाची गरजधार्मिक संकुचितपणा सोडून समन्वयवादी विचार स्वीकारा! – परमात्मराज महाराज